मुंबई : सार्वजनिक आरोग्य खात्यात पारदर्शक बदल्या होतात, अर्थपूर्ण व्यवहार होत नाहीत असे कोणी सांगूनही खरे वाटणार नाही. पण या विभागाचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ते करून दाखवले आहे. त्यासाठी आता राजपत्रित अधिकारी महासंघाने पत्रक काढून मंत्र्यांचे जाहीर काैतुक केले आहे.
डॉ. सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, वर्ग १ ते ३ पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्राधान्यक्रम देऊन केल्या. बदली करण्यापूर्वी प्रत्येकाकडून प्राधान्यक्रम मागण्यात आला. दहा ठिकाणे सुचविण्याची मुभा देण्यात आली. सगळे काही ऑनलाइन होते. बदल्यांचे अधिकार मंत्री कार्यालयात एकवटण्याऐवजी खाली आयुक्तांना देण्यावर भर दिला गेला. ज्येष्ठतेचा निकषदेखील लावला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहा पर्याय दिले तरी बहुतेकांना पहिल्या किंवा दुसऱ्या पर्यायाच्या ठिकाणीच बदली मिळाली.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना १,०५५ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी (वर्ग अ) ४०२ जणांना पहिल्या पसंतीचे ठिकाण मिळाले. १५७ ना दुसरे, ७६ ना तिसरे १४५ ना चौथे प्राधान्य ठिकाण मिळाले. प्राधान्यक्रम न दिलेल्या अधिकाऱ्यांपैकी ११५ जणांना त्याच तालुक्यात, १०२ जणांना त्याच जिल्ह्यात, तर ५८ जणांना त्याच मंडळात बदली मिळाली. वर्ग ब च्या अधिकाऱ्यांमध्ये १९४ पैकी ८७ जणांना पहिल्या पसंतीचे ठिकाण मिळाले. ३५ जणांना दुसरे, १७ जणांना तिसरे आणि २९ जणांना चौथे प्राधान्य ठिकाण मिळाले. वर्ग अ मधील ७३ टक्के अधिकाऱ्यांना, तर वर्ग ब मधील ८६ टक्के अधिकाऱ्यांना पहिल्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाली.
बदल्यांसाठी बदनामी विकत घ्यायची नाही हा विचार समोर ठेवला आणि पारदर्शकता आणली. दरवर्षी याच पद्धतीने बदल्या केल्या जातील. - डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री
बदल्यांसाठी एक स्वतंत्र सॉफ्टवेअरच तयार करण्यात आले. त्याद्वारे सर्व कार्यवाही करण्यात आली.- मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग
बदल्यांमधील गडबडींच्या टप्प्यातून सार्वजनिक आरोग्य विभागाची सुटका झाली याचे समाधान आहे. पारदर्शक बदल्यांमुळे अधिकारी अधिक चांगले काम करतील. मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आभार मानावेत तितके कमीच.- डॉ. राजेश गायकवाड, अध्यक्ष