सांगली : मराठीला अभिजात दर्जा देणे हे कोणा एकाचे कर्तृत्व नाही. शासन हाती असल्याने एखाद्या व्यक्तीच्या काळात दर्जा मिळाला अशी स्पष्टोक्ती दिल्लीतील ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केली. सांगलीत शुक्रवारी त्यांना राजमती पाटील ट्रस्टतर्फे प्रा. अविनाश सप्रे यांच्या हस्ते जनसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.डॉ. भवाळकर म्हणाल्या, संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे उत्तरायणाच्या टोकाला अपघाताने मिळालेली गोष्ट आहे. निवडणूक झाली असती, तर या जन्मी अध्यक्ष झाले नसते. सर्व साहित्य संस्थांनी कोणतीही कुरकुर न करता माझ्या नावाला सहमती दिली. हा मराठी बोलणाऱ्या सर्वांचा सन्मान आहे.त्या म्हणाल्या, माझ्या भावाला सांगलीत वालचंद महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने त्याच्यासाठी मीपण सांगलीत आले. आता घरचे ओरडतात, किती दिवस सांगलीत राहणार? पण सांगलीतच माझा प्रपंच आहे.प्रमुख पाहुणे प्रा. सप्रे म्हणाले, चार विद्वान एकत्र आले की एकमत होत नाही, पण अध्यक्षपदासाठी तारा भवाळकर यांच्या नावावर एकमत झाले. अध्यक्षाच्या नावासोबतच वादही सुरू होतात, पण ताराबाईंबद्दल निर्विवाद स्वागत झाले. ट्रस्टचे सचिव सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जयश्री पाटील, दीपक पाटील, लठ्ठे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांतीनाथ कांते, सचिव सुहास पाटील, सुदर्शन पाटील, राजगोंडा पाटील आदी उपस्थित होते.
नाटक हे पहिलं प्रेमडॉ. भवाळकर म्हणाल्या, नाटक ही माझी पहिली आवड आहे. आम्ही नाट्यसंस्था स्थापन केली होती. मुलांसाठी नाट्यस्पर्धा सुरू केल्या. ॲमॅच्युअर संस्थेतर्फे नाट्य चळवळ सुरू केली. मला नाटकात अभिनयासाठी रौप्य पदक मिळाले, त्यानंतर रंगभूमी सोडून दिली.
नाटकामुळे नोकरीवर गदाडॉ. भवाळकर म्हणाल्या, सांगलीत भावे नाट्यगृहात मी पहिल्यांदा मी रंगमंचावर उभारले, तोपर्यंत सांगलीत कोणतीही प्रापंचिक बाई नाटकात काम करत नव्हती. मी नोकरी करत असलेल्या संस्थेतील लोकांनी मला नोकरीवर का ठेवायचे? असा प्रश्न उपस्थित केला. बाईंच्या नाटकामुळे आमच्या मुलींवर वाईट परिणाम होत आहेत असा ठपका ठेवला. पण संस्थेतील पुरुष संचालक माझ्या बाजूने उभे राहिले. माझ्या शिकविण्याबद्दल कोणाचीही तक्रार नसल्याने नोकरी टिकून राहिली.