"राज्यात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा’’, नाना पटोले यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 06:37 PM2024-08-06T18:37:18+5:302024-08-06T18:38:25+5:30

Nana Patole Statement on Reservation: १० वर्ष केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

"The embarrassment of reservation in the state is due to BJP, Prime Minister Modi should take the initiative to solve this problem", demanded Nana Patole. | "राज्यात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा’’, नाना पटोले यांची मागणी

"राज्यात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा’’, नाना पटोले यांची मागणी

मुंबई - राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही फडणवीस यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करत, सत्तेत आलो तर २४ तासात आरक्षणांचा प्रश्न सोडवतो अशी वल्गना केली होती, पण १० वर्ष केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तसेच आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून, जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे असे राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितले आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाने राज्यातील जाती जातीत भांडणे लावण्याचे पाप केले आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा संपवण्याचे काम केले आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपाने मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल करुन सामाजिक एकोप्याला बाधा पोहचवली आहे. आरक्षणावर सत्तेत बसलेल्या लोकांना निर्णय घ्यायचा असताना ते विरोधी पक्षांनाच विचारत आहेत. काँग्रेस पक्षाची आरक्षणावर भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे असे राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितले आहे आणि हे काम केंद्र सरकारचे आहे त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकारने त्यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. राज्यात व केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास आरक्षणाचा प्रश्न सोडवू. 

मराठा समाजातील प्रतिनिधींच्या भेटीबद्दल बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये मराठा समाजातील लोकांनी भेट घेतली असताना त्यांच्यासमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आता पुन्हा कोणी भेटणार असतील तर त्यांचेही स्वागत आहे. त्यांच्याशीही चर्चा करु असेही नाना पटोले म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मध्य प्रदेशात भाजपाने लाडली बहणा ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणली आणि सरकार येताच ती बंद केली. तसेच महाराष्ट्रातही निवडणुकीच्या तोंडावर भाजपाप्रणित महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. केवळ महिलांच्या मतांवर डोळा ठेवून ह्या योजनेची घोषणा केलेली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या योजना काँग्रेस सरकारनेच सुरु केल्या आहेत. कर्नाटक व तेलंगणात काँग्रेस सरकारची महालक्ष्मी योजना सुरु आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेस मविआचे सरकार आल्यानंतर या योजना मोठ्या प्रमाणात राबवेल, असे नाना पटोले यांनी सांगितले. 

राज्यात पूरस्थिती भयानक आहे, शेतातील पिके व लोकांची घरेही वाहून गेली आहेत, त्यांच्या निवाऱ्याची सोय नाही, अन्नधान्याची सोय नाही. सरकारने अद्याप पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत. शेतकरी व पूरग्रस्त भागातील लोक सरकारी मदतीची अपेक्षा करत आहेत पण महायुती सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. पूरस्थितीमुळे शेतकरी कर्ज भरणा करु शकत नाही, त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवावी. तेलंगणातील काँग्रेस सरकारप्रमाणे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर काँग्रेस मविआचे सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल असेही  नाना पटोले म्हणाले.

Web Title: "The embarrassment of reservation in the state is due to BJP, Prime Minister Modi should take the initiative to solve this problem", demanded Nana Patole.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.