"पालघरचे वाढवण बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी’’, नाना पटोलेंचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 02:32 PM2024-08-30T14:32:46+5:302024-08-30T14:35:56+5:30

Nana Patole Criticize PM Narendra Modi:पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या बंदराचे भूमीपूजन होत आहे. हे बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी उभारले जाणार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

"The expansion of Palghar port is for the benefit of a special friend of the Prime Minister", alleged Nana Patole   | "पालघरचे वाढवण बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी’’, नाना पटोलेंचा आरोप  

"पालघरचे वाढवण बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी’’, नाना पटोलेंचा आरोप  

मुंबई -  मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपा सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याने जनतेत तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण घाईघाईने केले होते. राजकीय लाभ उठवण्यासाठी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केल्याने लोकांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री माफी मागत असले तरी त्याचा काही फायदा नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तसेच  पालघरचे वाढवण बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी बांधण्यात येत आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या बंदराचे भूमीपूजन होत आहे. हे बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी उभारले जाणार आहे, स्थानिकांचा त्याला तीव्र विरोध आहे. पंतप्रधानांचा दौरा असल्याने विरोध करणाऱ्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. विरोधकांना नजरकैदेत ठेवणे मोगलाईपेक्षा वाईट आहे पण आता जनताच भाजपाला नजरकैदेत ठेवेल, अशा इशारा नाना पटोले यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की,  भाजपा युती सरकार कमीशनखोर आहे, त्यांनी महाराजांच्या पुतळ्यातही कमीनखोरी केली. या सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो यावरून या पुतळ्याचे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे होते हे दिसते. आता राज्य सरकार याची जबाबदारी नौसेनेवर टाकत आहे तर नौसेनेने राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. राज्यात व केंद्रात डबल इंजिन सरकार आहे, ते जबाबदारी झटकत आहेत. महाराजांचा अपमान करणे हीच भाजपाची मानसिकता आहे. महाराजांचा अवमान केल्याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज "मोदी माफी मागा" नावाने आंदोलन सुरु आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे मोकाट आहेत आणि त्यांना जाब विचारणारे शिवप्रेमी नजरकैदेत ही सरकारची कार्यपद्धती आहे.

आज या सरकारने प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षाताई गायकवाड, आ. भाई जगताप, माजी खा. हुसेन दलवाई, आ. अमिन पटेल यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. हे सरकार घाबरट असून या सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप असून जनता आता यांना धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले. 

Web Title: "The expansion of Palghar port is for the benefit of a special friend of the Prime Minister", alleged Nana Patole  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.