CM पदाचा चेहरा, मविआत चढाओढ; उद्धव ठाकरेंसह बरेच इच्छुक, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 04:53 PM2024-08-09T16:53:05+5:302024-08-09T16:53:25+5:30

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणायचा की नाही यावर सध्या निर्णय नाही. मात्र उद्धव ठाकरे हे मविआचा चेहरा बनण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. 

The face of the CM post, Many aspirants including Uddhav Thackeray in Mahavikas Aghadi, says Congress leader Prithviraj Chavan Reaction | CM पदाचा चेहरा, मविआत चढाओढ; उद्धव ठाकरेंसह बरेच इच्छुक, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

CM पदाचा चेहरा, मविआत चढाओढ; उद्धव ठाकरेंसह बरेच इच्छुक, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी ३ दिवसीय दिल्ली दौरा केला. या दौऱ्यातून उद्धव ठाकरे स्वत:ला मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतायेत अशी चर्चा सुरू होती. विरोधकांनीही यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मात्र महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे करण्याची गरज नाही असं सांगत ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केले आहे. 

पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे दिल्लीत गेले, त्यांची काय चर्चा झाली माहिती नाही. विरोधी पक्ष म्हणून जेव्हा आपण निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा कुणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाही अशी महाराष्ट्रात परंपरा आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर निवडणूक लढणार आहोत. सत्तेत आल्यानंतर तो जाहिरनामा पूर्ण करणार आहोत. त्यामुळे चेहरा पुढे करण्याची परंपरा नाही आणि त्याला मान्यता मिळेल असंही वाटत नसल्याचं त्यांनी स्पष्टच सांगितले.

त्याशिवाय निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, मग मुख्यमंत्रिपद कोणत्या व्यक्तीला द्यायचं हे त्या पक्षाचे श्रेष्ठी ठरवतात. त्यामुळे यंदा काही वेगळं घडेल असं वाटत नाही. जाहीरनामा हा चेहरा नाही तर कार्यक्रम आहे. आम्ही त्या कार्यक्रमावर निवडणूक लढणार आहोत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची काही गरज नाही.  निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवला जाईल. त्यावेळी जो पक्ष मोठा असेल त्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री ठरवतील असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे तुम्हाला भविष्यात कळेल. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत असताना कुठलाही मोठा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय जर जाहीर केला तर ते चार भिंतीत ठरलेल्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं होईल. आम्ही एकमेकांची बोलूनच निर्णय घेऊ आणि ते सांगू असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मीही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक, पण...

महाविकास आघाडीत एखादा चेहरा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत आम्ही अजून चर्चा केली नाही. उद्धव ठाकरे हे मविआचे प्रमुख नेते आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात फिरून त्यांनी समाज जागरुक केला. त्यांच्या पक्षाचे नेते ते आहेत पण आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांनाही महाराष्ट्रात तेवढेच महत्त्व आहे. इतकी वर्ष राजकारणात घालवून शरद पवारांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहचलो. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण शेवटी व्यवहारी भूमिका राजकारणात असणं आवश्यक आहे. काँग्रेसमध्ये २-३ जण आहेत, राष्ट्रवादीत १-२ जण आहेत, शिवसेनेत काही आहेत प्रत्येकाची इच्छा असते. महायुतीतही ५-६ जण आहेत. परंतु संख्या किती याला राजकारणात महत्त्व आहे असं विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.  

विरोधकांचा महाविकास आघाडीवर निशाणा

महाविकास आघाडीतील मतभेद आता तर वरवर दिसताहेत. पुढे ते टोकाचे होणार आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यासाठी गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले मुख्यमंत्री पदाचा आमचा चेहरा नंतर ठरवला जाईल. यावरून महाविकास आघाडीत विधानसभेत भविष्यात काय वाढलेय हे तुमच्या लक्षात येईल असा निशाणा भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी साधला. 
 

Web Title: The face of the CM post, Many aspirants including Uddhav Thackeray in Mahavikas Aghadi, says Congress leader Prithviraj Chavan Reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.