'देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पाहून लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मते दिली.' या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानाने महायुतीत कुरबूर सुरू झाली. धस यांच्या विधानाला शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी उपरोधिक शैलीत उत्तर दिले. 'एकनाथ शिंदे कधीही म्हणाले नाहीत की, माझ्या एकट्यामुळे हे झालं', असे देसाईंनी धसांना सुनावलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, "सुरेश धस यांचं हे मत असलं, तरी महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो. २०२४ च्या निवडणुकीला महायुती सामोरं जात असताना सर्व नेत्यांनी सांगितलं होतं की, त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सामोर जात आहे. त्यावेळी एकनाथ शिंदेंचा चेहरा घेऊन निवडणुकीला सामोरं गेलो.
शिंदेंमुळे लाडकी बहीण योजना मिळाली -देसाई
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल आज जरी तुम्हाला महिलांना विचारलं, तर आजदेखील महिला सांगतात की, केवळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते म्हणून आम्हाला ही योजना मिळाली. त्यामुळे शेवटी ही सामूहिक जबाबदारी आहे", असे शंभूराज देसाई म्हणाले.
नेतृत्व शिंदेंचं होतं, धसांना देसाईंचं उत्तर
"सुरेश धस जरी म्हणत असले की, फडणवीसांचा चेहरा होता. फडणवीसांचा चेहरा होता, पण ज्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या, ते नेतृत्व एकनाथ शिंदे यांचं होतं. आणि शिंदे साहेब हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना सोबत घेऊन काम करत होते", असे उत्तर देसाईंनी सुरेश धसांना दिले.
'माझ्यामुळे झालं असं शिंदे कधीच म्हणाले नाहीत'
"एकनाथ शिंदे हे नेहमी म्हणायचे की, मी आणि माझ्यासोबतचे दोन्ही मुख्यमंत्री मिळून आम्ही हे सरकार चालवत आहोत. शिंदे कधीच असं म्हणाले नाही की, मी एकट्याने निवडणुका लढवल्या, माझ्या एकट्यामुळे हे झालं. एकनाथ शिंदे आजही म्हणतात आम्ही तिघांनीही प्रयत्न केले म्हणून हे यश मिळालं. महायुतीचं यश हे तिन्ही पक्षाचं आहे. त्यावेळी नेतृत्व एकनाथ शिंदे यांचं होतं', असे म्हणत देसाईंनी धसांना सुनावलं.