लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदार आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, या प्रयत्नात आहेत; मात्र यावरून आता सत्ताधारी पक्षांमधील मतभेद समोर येत आहेत. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पडसाद दिसून आले.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत आपल्या विभागाला २५/१५ योजनेसाठी अतिरिक्त निधीची मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावर ‘पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायची का?’ असा संतप्त सवाल अजित पवार यांनी महाजन यांना विचारल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘नको तिथे खर्च नको’आपल्या गटाचे आमदार असलेल्या सिन्नर मतदारसंघातील स्मारकासाठी कोट्यवधींची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव अजित पवार यांनी मंत्रिमंडळात मांडला होता. हा धागा पकडत ‘नको तिथे खर्च नको अशी तुमची भूमिका असेल तर मग इथे खर्च कशाला?’ असा सवाल गिरीश महाजन यांनी बैठकीत उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले.
योजनांसाठी कर्ज काढण्याची शक्यताराज्याच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात जवळपास १ लाख कोटी रुपयांच्या लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. याचा भार राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. प्रसंगी या योजनांसाठी सरकारला कर्ज काढावे लागण्याची शक्यता असल्याने वित्त विभागाची सध्या कसरत सुरू आहे.