वाशिम - मंगरुळपीर शहरात शनिवारी उरूसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीत धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. या मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मिरवणुकीला केवळ २ डीजेंना परवानगी दिलेली असताना त्यात २१ डिजे बेधडकपणे वाजवत असल्याचंही निदर्शनास आले.
अनेक वर्षापासून मंगरुळपीर येथे उरूसानिमित्त रॅली काढण्यात येते. शनिवारी निघालेल्या या रॅलीत काही जण चक्क औरंगजेबाचा फोटो हातात घेत नाचताना दिसले. काहींनी पाकिस्तानचे झेंडे झळकावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. काहींनी संघटनांनी औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याचे दहन केले. घडलेल्या प्रकारानंतर शहरात तणावपूर्वक शांतता आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकाराची तपासणी करत २ जणांना अटक केली आहे. १४ तारखेला निघालेल्या मिरवणुकीत काहींनी औरंगजेबाचे फोटो झळकावत घोषणाबाजी केली. सध्या या प्रकरणाचा आम्ही आणखी तपास करत आहोत अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात औरंगजेबावरून वादंगगेल्या काही महिन्यांपासून राज्यात औरंगजेबावरून वादंग सुरू आहे. अजित पवारांनी छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते असं वादग्रस्त विधान केले. त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आले तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचे मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते असं आव्हाड म्हणाले. त्यानंतर भाजपाने आव्हाडांबद्दल आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केल्याने विरोधकांनी भाजपावर चौफेर टीका केली.