भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:37 PM2024-10-22T15:37:28+5:302024-10-22T15:39:30+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात विविध क्षेत्रातील आणि पक्षातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यात अनेक नेत्यांचं पक्षांतरं पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा सरकारच्या काळात राजकुमार बडोले यांच्यावर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी होती. बडोले हे अर्जुनी मोरगाव मतदारसंघात इच्छुक आहेत. ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने तिथे बडोलेंना उमेदवारी दिली जाऊ शकते.
बडोले यांच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात निवडून येण्यासाठी तिन्ही पक्ष आणि महायुतीतील घटक पक्षांच्या संमतीने जे जे काही शक्य असेल ते करण्यासाठी आमची बोलणी सुरू आहेत. आम्ही सरकारमध्ये केलेली कामे, जाहिरनामा यावर सांगण्यासारखं भरपूर आहे. कोण कुठे गेले त्यावर लोकांना रस नाही. राज्याचा विकास व्हावा. सर्वांगिण विकास करण्याकडे आमचा कल आहे. जागावाटप अंतिम झाल्यानंतर ते जाहीर केले जाईल असं त्यांनी म्हटलं.
राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून दोनदा भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. महायुतीत सध्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. मात्र ही जागा भाजपाला सुटेल अशी अपेक्षा राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली होती. अनेक दिवसांपासून बडोले राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र या अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका असं बडोले यांनी म्हटलं होते. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी ७१५ मतांनी बडोलेंचा पराभव केला होता. आता राजकुमार बडोले हे राष्ट्रवादीत आल्याने या जागेवरील दादांसोबत आलेले आमदार चंद्रिकापुरे यांची चिंता वाढली आहे.
बडोलेंसह इतर पक्षातील नेत्यांनीही केला राष्ट्रवादीत प्रवेश
हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह, हिंद केसरी पैलवान अमोल बराटे, हिंद केसरी पैलवान अक्षय हिरगुडे, महाराष्ट्र केसरी पैलवान अक्षय गरुड, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज वहाग, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान सागर गरुड, महाराष्ट्र चॅम्पियन ऋषिकेश भांडे, मुंबई केसरी पैलवान आबा काळे, पुणे महापौर केसरी पैलवान सोनबा काळे आदींनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेतील विविध पक्षातील नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षा अॅड. वसुधा कुंभार, सांगली विधानसभा क्षेत्र शहराध्यक्षा रुकसाना कादरी, मिरजच्या नगरसेविका स्वातीताई पारधी, नगरसेविका राणी मोरे, सां.मि.कु. महानगरपालिकेचे माजी सभापती पुष्पा सोनवणे, माजी नगरसेवक संतोष देवळेकर, माजी नगरसेविका सुरेखा कांबळे, कुपवाड विधानसभा क्षेत्र शहराध्यक्ष प्रवीण बाबर, सांगली शहर युवक उपाध्यक्ष दयानंद टोवळे, संघटक विधानसभा क्षेत्र प्रसाद पाटील आदींचा समावेश आहे.