मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. राष्ट्रवादीशी बोलणी जवळपास पूर्ण झाली आहेत. काँग्रेसकडून अद्याप कोणताही फॉर्म्युला आलेला नाही. लवकरच बोलणी केली जातील, दिल्लीतील ‘इंडिया’च्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बोललो आहे. सध्या ज्या काही बातम्या येत आहेत, त्याकडे कुणीही लक्ष देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत मी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, असे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी शनिवारी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला, उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी बोलणी सुरू आहे. त्यांचे जे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत माझ्याशी बोलत नाहीत तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही यावर भाष्य करणार नाही. लवकरच दिल्लीत आमची पुन्हा बैठक होईल आणि सगळे सुरळीत पार पडेल. वंचितसोबतसुद्धा आमची बोलणी सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत संजय राऊत - ठाकरे गटाचे दोन नेते आणि वंचितच्या नेत्यांमध्ये बोलणी होईल. एकत्र बैठक होईल, असे ठाकरे म्हणाले.
संजोग वाघेरे ठाकरे गटात- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून तयारी करण्याचा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला. - शिवबंधन बांधून संजोग वाघेरे यांचे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत स्वागत केले. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार सचिन अहीर उपस्थित होते. - देशात महागाई, बेरोजगारी, अशा अनेक समस्या आहेत. संविधानाबाबतीत सत्ताधाऱ्यांनी चुकीची भूमिका घेतली आहे. आपण शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करायचे ठरवले, असा निर्धार संजोग वाघेरे यांनी यावेळी व्यक्त केला.
सत्तेकडे गर्दीचा ओघमला या काळात भावुक आणि घाऊक याच्यातील फरक कळायला लागला आहे. कोण घाऊक आहेत ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मावळ लोकसभा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून जिंकत आलेलो आहोत. गजानन बाबर खासदार होते. गेल्यावेळी ज्यांना शब्द दिल्याने उमेदवारी दिली त्यांनी गद्दारी केली. जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा ओघ असतो. सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीने आलात, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी वाघेरे यांचे स्वागत केले.