मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत दोन दिवसांत संपुष्टात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागात मनोज जरांगे हे सभा घेत असून, त्याला मोठा प्रतिसादही लाभत आहे. दरम्यान, हे आंदोलन अधिकच तीव्र करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आंदोलकांनाही महत्त्वाचं आवाहान केलं आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मात्र मराठा आरक्षण देण्यामध्ये अनेक कायदेशीर बाबींचा अडथला आहे. त्या पूर्ण करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे मराठा बांधवांनी अजून काही काळ थोडा धीर धरावा, असे आवाहने एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणांसाठी काही मराठा तरुणांनी केलेल्या आत्महत्यांबाबत दु:ख व्यक्त केले. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मी मराठा आरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. मी खोटी आश्वासनं देत नाही.
मी दिलेला शब्द पाळणार. मात्र काही संवेदनशील घटना घडत आहे. तरी कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहनही शिंदे यांनी केलं आहे.दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. मागच्यावेळी मराठा आरक्षणाबाबत ज्या गोष्टी मांडता आल्या नाहीत, त्या यावेळी मांडल्या जातील, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मराठवाड्यात जुन्या नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. खोलवर जाऊन नोंदी तपासण्याचे काम समितीमार्फत सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आरक्षण मिळेपर्यंत जे लाभ आहेत ते मराठा समाजाला जास्तीत जास्त कसे मिळतील यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सागितले. मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या पुनरूच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. नवरात्रोत्सवानिमित्त ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या आई भवानी मातेचे मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब दर्शन घेत पूजा केली. यावेळी राज्यावरील, बळीराजावरील संकट दूर करून राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असं साकडं घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.