केंद्र सरकारकडून हिट अँन्ड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात संपूर्ण देशात ट्रक आणि डंपर चालकांनी चक्का जाम आंदोलन केले आहे. हा कायदा चुकीचा असून तो परत घेतला पाहिजे अशी मागणी करत मुंबई, इंदूरपासून दिल्ली हरियाणा, यूपीसह अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी ट्रक रस्त्यावर उभे करत वाहतूक रोखली आहे.
या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रात देखील काही ट्रक चालकांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांवर हल्ला केला आहे. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हीट अँड रन’संदर्भातील नव्या कायद्याविरुद्ध जनमाणसात रोष आहे. वाहनचालक रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण व्यवस्था मोडकळीस येऊ लागली आहे, असं विजय वडेट्टीवर ट्विटद्वारे म्हणाले.
अनेक जिल्ह्यातील पेट्रोलपंप स्टॉक नसल्याने बंद पडत आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत. परिस्थिती बिकट होत असतानाही नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर अफवांवर विश्वास ठेवू नका, जनतेने घाबरून जाऊ नये, जिल्ह्यात मुबलक पेट्रोल आणि गॅसचासाठा असल्याचे सांगत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणून राज्य सरकार त्यांना पुढे करत आहे आणि खोटी आश्वासने देऊन जनतेच्या रोषापासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, पंपावर मोठी रांग
ट्रक चालकांच्या देशव्यापी आंदोलनाचा फटका सर्वसामान्य जनतेला होत आहे. ट्रक चालकांच्या संपामुळे इंधन वाहतूक थांबली आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच काही पेट्रोल पंपावर इंधनच नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने जिथे मिळेल तिथे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.गेल्या ३ दिवसांपासून इंडियन ऑयलच्या इंधनाचा पुरवठा करणाऱ्या वाहनांवर परिणाम झाला आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल डिझेलचे संकट उभे राहिल्याने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात इंधन पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
काय आहे हिट अँड रन कायदा?
हिट अँड रन या कायद्याद्वारे सरकारने अपघातातील वाहनचालकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ज्यात जर कुठलाही ट्रक अथवा डंपर चालकाने कुणाला चिरडले तर त्याला १० वर्षाची जेल होऊ शकते. त्याशिवाय ७ लाखांचा दंडही भरावा लागू शकतो. याआधी अशा प्रकरणात आरोपी ड्रायव्हरला जामीन मिळत होता त्यामुळे तो लगेच बाहेर यायचा. त्याचसोबत या सध्या २ वर्षाची शिक्षेची तरतूद होती.