मुंबई - सरकार सर्व धर्माचा आदर करते, परंतु जर कुणी अनधिकृत बांधकाम करत असेल तर त्यावर कारवाई होईल. राज ठाकरेंनी भाषणात जे बांधकाम निदर्शनास आणले. त्यावर सीआरझेड कायद्यानुसार कारवाई झाली आहे. या गोष्टी हळूहळू बांधल्या जातात त्यामुळे सहसा त्याच्यावर लक्ष जात नाही. मात्र हे समोर आल्यानंतर सरकारने योग्य ती पावले उचलली आहेत असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सीआरझेडमध्ये कुठलेही काम करताना परवानगी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकही कोर्टाने रोखले आहे. जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोवर आम्हीही काम सुरू करू शकत नाही. राज ठाकरेंनी भाषणात जो मुद्दा उचलला आहे तो बिल्कुल योग्य आहे. यात धर्माचा विषय नाही. पालकमंत्री म्हणून आम्हीही हाजीअलीला जाण्यासाठी नवीन प्रकल्प हाती घेतोय. त्याचीही परवानगी रखडली आहे. लवकरच ते काम होईल. सरकार प्रत्येक धर्माचा आदर करते परंतु जर कुणी चुकीचे काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी असं त्यांनी सांगितले.
तसेच सीआरझेड कायद्यानुसार कारवाई झाली आहे. ती चुकीची नाही. समुद्रात कुठलेही बांधकाम करता येत नाही. कुणी हे करत असेल तर ते सावधरितीने करतात. जी दगडे मजारीजवळ आहेत तीदेखील हटवण्यात येतील. तो परिसर स्वच्छ होईल. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचे निरसन होईल. राज ठाकरेंनी जो मुद्दा निदर्शनास आणला त्यावर आता कारवाई झाली. अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे असंही मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नियमांचे पालन व्हायलाच पाहिजे. जे कुणी करणार नाही त्यांच्यावर वेळेवर प्रतिबंध करावे लागेल. सरकार कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. धर्माच्या नावाखाली कुणी अनधिकृत काम करत असेल तर योग्य नाही. अनधिकृत बांधकामाचा दर्गा अथवा मशिदीशी काही संबंध नाही. जे सीआरझेडचे नियम होते त्यानुसार कारवाई झाली आहे असं दीपक केसरकरांनी सांगितले.
...हा त्यांचा कौटुंबिक विषयराज ठाकरे जे बोलतायेत हा त्यांच्या अंतर्गत कौटुंबिक विषय आहे त्यावर मी बोलणार नाही. परंतु लोकांच्या ही गोष्ट जरूर निदर्शनास आली असेल की, लोक पक्ष सोडून जात होते तेव्हा बाळासाहेबांची इच्छा होती कुणी पक्ष सोडू नये. मात्र उद्धव ठाकरेंनी ज्यांना जायचे त्यांनी निघून जा असे स्पष्ट म्हटले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, पण उद्धव ठाकरेंचा तसा नाही. त्यामुळे अनेक लोक त्यांना सोडून जात आहे अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.