राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन अनेक वर्षे महाराष्ट्रात काम केलं. त्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची चूक झाली. त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही. ज्यांना अधिकार आहे ते निर्णय घेतील, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. नागपुरात ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वातावरण तापलं आहे. त्यावर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका पुन्हा एका स्पष्ट केली. राज्यपालांची चूक झाली, त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आमची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. किल्ले प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन साजरा केला जात आहे. परंतु खासदार उदयनराजे यांनी राज्यपालांविरुद्धच्या नाराजीमुळे या सोहळ्याला जाणं टाळलं. याविषयी विचारलं असता बावनकुळे म्हणाले की, उदयनराजे असो किंवा आम्ही आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?
'आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"