महायुती सरकारच्या योजना सुरूच राहतील, अजित पवार यांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 11:59 PM2024-07-21T23:59:58+5:302024-07-22T00:00:31+5:30
Ajit Pawar News: विधानसभा निवडणुकांनंतर महायुतीचेच सरकार परत येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका.
पिंपरी - महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजना विधानसभा निवडणुकीचा जुमला आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांनंतर महायुतीचेच सरकार परत येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. लोकसभा निवडणुकीनंतर आमचे आमदार पक्षांतर करतील, अशी अफवा विरोधकांनी पसरविली होती. मात्र, एकाही आमदाराने पक्षांतर केले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेत सांगितले.
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्धार मेळावा पार पडला. त्यावेळी अजित पवारांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी अजित पवारांनी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, महायुती सरकार ‘लाडकी बहीण’ योजना तसेच शेतकऱ्यांसाठी वीज कर्जमाफी, विद्यार्थ्यांना शालेय भत्ते आदी विकासाची कामे करीत आहेत. मात्र, विरोधकांनी ‘मी जॅकेट कुठलं घातलंय’ यात रस आहे. यापेक्षा विकासाच्या गोष्टीवर बोला, असा टोला पवार यांनी लगावला.
‘राज्यसभे’साठी मागणी करणार : पवार
राज्यसभेवर पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत महायुतीच्या बैठकीमध्ये मागणी करणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, ही माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लागलीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यातही महापालिकेत नवे चेहरे देऊन सगळ्या घटकांना न्याय द्यावा लागेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान विधानसभा निवडणुका लागतील, असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले.