- यदु जोशी मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार मराठवाड्याला हजारो कोटी रुपयांचे पॅकेज देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. शनिवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकार मराठवाड्यावर निधीचा आणि घोषणांचा प्रचंड वर्षाव करणार आहे.
तब्बल सात वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्याला या बैठकीच्या निमित्ताने काय काय द्यायचे यावर गेले आठ दिवस मंत्रालयात सरकारी पातळीवर मोठे चिंतन-मंथन झाले. मंत्री कार्यालयाकडून आणि सचिवांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आणि त्यातून एक पॅकेज तयार करण्यात आले आहे. त्यातील संभाव्य घोषणांचा महत्त्वाचा तपशील हाती लागला आहे.
३,२२५ कोटींची धवलक्रांती मराठवाड्यात दूध उत्पादनाला वेग देण्यासाठी ३,२२५ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे. मराठवाड्यातील ८,६०० गावांचा समावेश करण्यात येईल. वैयक्तिक बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी किमान पाच व कमाल १० दुधाळ जनावरांचे वाटप केले जाईल. एका गावात किमान ५० दुधाळ जनावरांचे अनुदान तत्त्वावर वाटप करण्यात येणार आहे.
बांधकाम विभागाचे पॅकेज १२ हजार कोटींचे- मराठवाड्यातील १०३० किलोमीटर लांबीच्या ३१ रस्त्यांची सुधारणा. त्यासाठी १०,३०० कोटी रुपये खर्चाची योजना.- नांदेड गोदावरी घाट हा साबरमती नदीच्या धर्तीवर रिव्हर फ्रंट म्हणून विकसित केला जाईल. १०० कोटी रुपये प्रस्तावित.- महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा तीनमध्ये मराठवाड्यातील ३०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांची सुधारणा. त्यावर २,४०० कोटी रुपये खर्च.
कोणत्या योजनांना किती निधी? - मराठवाड्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणी देणे : २८४ कोटी- पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसविणे : १८८ कोटी - संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण विकसित करणे - १५० कोटी - शनी देवगाव उच्च पातळी बंधारा : २८५ कोटी- पश्चिम वाहिनी मदनद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प : १४,०४० कोटी- तुळजाभवानी मंदिर विकास : १,३२८ कोटी- श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पाथरी, जि. परभणी : ९१.८० कोटी- श्रीक्षेत्र औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्राचा विकास : ६० कोटी