Mahayuti Eknath Shinde: मुंबई, दिल्लीत बैठका पार पडल्या तरी महायुती सरकारचं मंत्रिमंडळ कसं असेल, याबद्दल स्पष्टता आलेली नाही. त्यातच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत. शिवसेना गृहमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचेही राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. या सगळ्या राजकीय गोंधळात शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पक्षाची भूमिका मांडली.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत दीपक केसरकर म्हणाले, "सरकार स्थापन होतंय. ५ तारखेला शपथविधी आहे. सरकार स्थापन होत नाहीये, याचं कारण एकनाथ शिंदे आहेत, ही चुकीची समजूत आहे. अजिबात नाही. बघा भाजपने निरीक्षक आज नियुक्त केले आहेत, त्यांची बैठक होईल. त्याचा नेता निवडला जाईल. नंतर तो शपथ घेईल. एकनाथ शिंदेंनी पाच दिवस आधीच सांगितलं आहे की, मोदीजी, अमित शाह निर्णय घेतील, तो माझ्यासाठी अंतिम असेल."
एकनाथ शिंदे नाराज आहेत का?
मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा निश्चित होत नाहीये. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावर दीपक केसरकर म्हणाले, "हा लोकांचा बघण्याचा दृष्टीकोण असतो. विशेषतः जे लोक पराभूत झाले आहेत. ते अशा अफवा पसरवत आहेत की, शिंदे नाराज आहेत. ते (एकनाथ शिंदे) अजिबात नाराज नाहीत", असे दीपक केसरकर म्हणाले.
"मी मंत्री राहिलो आहे. मी चार वर्ष देवेंद्र फडणवीसांसोबत काम केलं आहे. गृह मंत्रालय कधीही गृहमंत्री एकटे चालवू शकत नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून गृह मंत्रालय चालवतात. आयपीएस ऑफिसर असतात. त्यांच्या बदल्यांचा पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे. सुरक्षेसंदर्भातील बैठक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होते. जो दररोज अहवाल दिला जातो, तो मुख्यमंत्र्यांना दिला जातो. दोघांचेही त्यावर नियंत्रण असते. पण, यावर इतकी चर्चा का होत आहे, मला कळत नाहीये. त्यामुळे गृह मंत्रालय देणे किंवा न देण्यात कोणतीही अडचण असू नये", असेही दीपक केसरकर म्हणाले.
शिवसेनेला गृह खातं हवं?
गृह खाते देण्याची शिवसेनेची मागणी आहे. या मुद्द्यावर दीपक केसरकर म्हणाले, "हे मी सांगू शकत नाही. एकनाथ शिंदेंची अमित शाहांसोबत चर्चा झाली होती. तर ते दोघे सांगू शकतात. मी तर प्रवक्ता म्हणून बोलत आहे."
मुख्यमंत्री कोण असायला हवं? याबद्दल बोलताना दीपक केसरकर म्हणाले, "मला वाटतं की ९९ टक्के देवेंद्र फडणवीस होतील. पण, शेवटी हे त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व निश्चित करतं. आमच्यासाठी ते जवळचे नेते आहेत. त्यांना आणि एकनाथ शिंदे यांना आम्ही मानतो. शिंदे बनावेत वा फडणवीस, पण, शिंदेंचा सन्मान ठेवला पाहिजे असे मला वाटते", असे दीपक केसरकर यांनी सांगितले.