मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या लग्नावरून मंगळवारी विधानसभेत मिश्कील टिप्पणी झाली. ठाकरे यांचे विरोधक मानले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विधानाचा आधार घेत केलेल्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला आणि त्यात सर्वपक्षीय सदस्य सहभागी झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी एकलहरे येथील रखडलेल्या वीज प्रकल्पाबद्दल लक्षवेधी मांडली होती. त्यावर चर्चा करतानाच वरील किस्सा घडला. यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले, एखाद्या प्रकल्पाचे काम सुरू झाले की अनेक कामगार त्यांचा गाव सोडून तेथे जातात. वर्ष दोन वर्षांतच प्रकल्पाचे काम बंद पडते. त्यामुळे कामगार बेरोजगार होतात. उद्या एखाद्या कामगाराचे लग्न तुटले तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का?
आदित्य ठाकरे यांनी नाशिक आणि नागपूरमधील ॲशपॉन्डचा मुद्दा मांडला. नांदगाव आणि वारेगाव येथे ७००-८०० एकर जागेत सात ते आठ फूट राख साठली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नांदगावमधील ॲशपॉन्ड साफ करण्याचा प्रयत्न केला गेला. आता पुन्हा अनेक ठिकाणी राख साठवणे सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी ती राख काढली गेली नाही तर ती वाहून शेतात जाण्याची शक्यता असते. ती काढणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यावर उत्तर देण्यास फडणवीस उभे राहिले. बच्चू कडू यांनी हा प्रश्न बहुधा आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत बघत विचारला का? असे फडणवीस यांनी आदित्य यांच्याकडे पाहून विनोदाने विचारले. सरकारने लग्न लावायचे… तर सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे ते म्हणाले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी ‘ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? की लग्न लावून देतो नाही तर आमच्यासोबत बसा’ अशी गुगली हसत हसत टाकली. त्यांच्या या गुगलीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘आधी लग्न कोंढाण्याचं,…असे म्हणत आणखी कोपरखळी मारली.
तोंड बंद करायचे, तर लग्न हा प्रभावी उपाय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्ही लग्न लावून द्यायची जबाबदारी घेतो… एखाद्याचे तोंड बंद करायचे असले तर हाच उत्तम आणि प्रभावी उपाय आहे. हे मी अनुभवातून सांगत आहे, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.