अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : घरात पतीचा मृतदेह, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरले, जन्मदात्याचे छत्र हरविल्याने मुलीसुद्धा शोकसागरात बुडाल्या. दुःख वियोगात असलेल्या त्या माउलीने व दोन मुलींनी मतदान केंद्रात जाऊन मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. ही घटना येथील वाॅर्ड क्रमांक १७ मध्ये घडली.
येथील रहिवासी शंकर ग्यानबा लाडे (४७) यांचे बुधवारी सकाळी ६ वाजता निधन झाले. पतीच्या दुःखवियोगात असलेल्या त्या माउलीने मतदान करण्याचा निर्णय घेतला. मृतदेह घरात असताना घरच्या सर्व मंडळींनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. त्यानंतर शंकर लाडे यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
पत्नीचा मृतदेह घरात; पतीने केले मतदान
कळमडू (ता. चाळीसगाव) : मुलगा लष्करात भरती होऊन कर्नाटकात प्रशिक्षणाला गेलेला, इकडे मतदानाच्या दिवशी पत्नी छायाबाई (४०) यांचे आकस्मिक निधन झाले. हे सर्व दु:ख विसरून राजेंद्र नामदेव बच्छे यांनी परिवारातील सदस्यांसह आधी मतदानाचे कर्तव्य पार पाडले, त्यानंतर सायंकाळी चार वाजता पत्नीवर अंत्यसंस्कार केले.
मुलगा देशसेवेसाठी सैनिकी प्रशिक्षणाला बेळगावला असल्याने आईच्या अंत्यविधीला तातडीने येऊ शकत नव्हता. त्यामुळे मुलगी रोहिणी बच्छे हिने मुलाप्रमाणे कर्तव्य पार पाडून आईला अग्नी डाग दिला.