भाजपाच्या एनडीए आघाडीविरोधात लढण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट वंचितला सोबत घेऊ पाहत आहेत. परंतु वंचितने जास्त जागांची मागणी केल्याने आजवर प्रकाश आंबेडकर यांचा मविआतील प्रवेश लांबला होता. आज अखेर आंबेडकर मविआच्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. यामध्ये आंबेडकर यांनी वंचितची भूमिका मांडली आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी इंडिया आघाडीबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.
माझा चेहरा नेहमी हसराच असतो, मी दु:खी होत नाही. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका. मविआच्या बैठकीत आम्ही काही मुद्दे ठेवले होते त्यावर तिन्ही पक्ष एकत्रित चर्चा करतील. त्यात काही त्रुटी असतील तर दूर करून त्यानंतर मसुदा तयार केला जाईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच महाविकास आघाडीची इंडिया आघाडीसारखे होऊ नये याची दक्षता घेण्याचे आम्ही ठरविल्याचेही आंबेडकर म्हणाले.
माझ्या मते इंडिया आघाडी आता राहिलेली नाही. तिकडे सपा आणि काँग्रेसही वेगेवेगळे लढणार असल्याची माहिती आहे. यामुळे महाराष्ट्रात तसे होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असे आंबेडकर म्हणाले. तसेच आज आमच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली असून पुढच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा केली जाईल, असे आंबेडकर म्हणाले.