राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री एका व्यक्तीने फोन करून ठार मारण्याची धमकी दिली. छगन भुजबळ यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर फोन करून त्याने ही धमकी दिली. दरम्यान या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात तपास करून संबंधित तरुणाला महाड येथून ताब्यात घेतले. प्रशांत पाटील असं धमकी देणाऱ्या या तरुणाचं नाव आहे. दारूच्या नशेत त्याने ही धमकी दिल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
छगन भुजबळ यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना देखील धमकी दिल्याची माहिती आता समोर आली आहे. काल (सोमवारी) मध्यरात्री १२ वाजता एका अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मला पन्नास लाख रुपये द्या, नाहीतर मी धनंजय मुंडे यांना जीवे मारिन, अशी धमकी फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं दिली.
धनंजय मुंडे यांच्या बीडमधील परळी येथील निवासस्थानी असलेल्या लँडलाईनवर धमकीचा फोन आला होता. या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत, तपास सुरू केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. सोमवारी रात्री त्यांचा मुक्काम पुण्यातील व्हीआयपी सर्किट हाऊस या ठिकाणी होता. दरम्यान सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भुजबळांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. त्याने "मला त्यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे, उद्या मी त्यांना मारणार आहे, आपण सांगून काम करतो, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला सांगण्याचं काम केलं आहे" असे म्हणून समोरील व्यक्तीने फोन कट केला.
पुणे पोलिसांकडे या घटनेची तक्रार आल्यानंतर त्यांनी जलद गतीने तपास केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक तपास करत अवघ्या काही तासात महाड येथून या तरुणाला ताब्यात घेतले. पहाटे सहा वाजता सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून सध्या त्याला पुणे शहराकडे आणले जात आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हे सर्व कृत्य दारूच्या नशेत केले असल्याचे समोर येत आहे.