मुंबई - उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देंवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभेतील शेवटच्या अधिवेशनात बोलताना मी पुन्हा येईन ही कविता म्हणून दाखवली होती. मात्र, या कवितेनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. मी पुन्हा येईन हे वाक्य महाराष्ट्रात फडणवीसांशी जोडले गेले. मी पुन्हा येईन हा फडणवीसांना विश्वास वाटत होता, पण विरोधकांनी तो त्यांचा अहंकार असल्याचं म्हटलं. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि फडणवीस पुन्हा सत्तेत आलेच नव्हते. त्यावरुनही त्यांना ट्रोल केलं गेलं. आता फडणवीसांची मी पुन्हा येईन ही घोषणा आणि जेपी नड्डा यांची आम्हीच येऊ ही घोषणा एकसारखीच असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून बिहारमधील सत्तांतरावर भाष्य करत नितीश कुमार यांना आगे बढो.. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यात, बिहारमधील भाजपच्या मेळाव्यात भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलेलं विधान देशभर चर्चेत होतं. त्या विधानापासूनच नितीशकुमार यांनी उचल खाल्ली आणि इतर पक्षांना संपवायला निघालेल्या भाजपला सत्तेतून हद्दपार केलं असे शिवसेनेनं म्हटलं आहे. यावेळी, फडणवीसांच्या मी पुन्हा येईन, या विधानाची आठवण सांगत, नड्डा यांची घोषणाही मी पुन्हा येईनसारखीच असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
''बिहारमध्ये सध्या तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या बरोबरीने सरकार बनवलं आहे. ही आघाडी 2024 मध्ये अशीच भक्कम राहिली तर लोकसभा निवडणुकांचे निकाल बदलू शकतात, हे सत्य आहे. महाराष्ट्रातील 'मी पुन्हा येईन' या घोषणेप्रमाणेच श्री. नड्डा यांची 'आम्हीच येऊ, फक्त आम्हीच' ही घोषणा आहे. लोकशाहीत मतपेटीच्या मार्गाने कोणीही येऊ शकेल, पण आम्हीच येऊ असे सांगणारे लोकशाही मानतात काय?, असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला विचारण्यात आला आहे.
सुशील मोदींनी शिंदे गटाचा दावाच खोडला
बिहारमधील भाजपचे नेते सुशील मोदी आता बरळले आहेत की, 'शिवसेना आम्ही फोडली. जे आमच्याबरोबर राहणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील. शिवसेनेला ते भोगावे लागले.' याचा काय अर्थ घ्यायचा? शिंदे गट सांगतोय त्यावर गुळण्या टाकण्याचाच हा प्रकार. आम्ही हिंदुत्व किंवा स्वाभिमानासाठी बाहेर पडलो हा दावाच सुशील मोदी यांनी खोडून काढला. शिंदे गट शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी फोडला हे त्यांनी जाहीर केल्यावर सगळय़ांचेच वस्त्रहरण झाले! पण आता त्यांच्याच बिहारमध्ये नितीश कुमार भाजपपासून दूर झाले. त्यावर काय बोलणार आहात?
राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो
शिवसेनेप्रमाणे नितीश कुमारांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला तेव्हा कुमारांनी उलटा तुम्हालाच डंख मारला हेच सत्य आहे. नितीश कुमार यांनी सध्या तरी एक वावटळ निर्माण केली. त्याचे वादळ झाले तर आव्हानाची स्थिती निर्माण होईल. 'ईडी' आणि 'सीबीआय'देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही. तेजस्वी यादवही बेधडक आहेत. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आले नाही. प्रत्येकाला सिंहासनावरून कधी तरी उतरायचे आहे. अहंकाराच्या भिंती जनताच तोडते. बिहारात त्या तुटल्या. महाराष्ट्रातही उद्ध्वस्त होतील. बिहारात नितीश कुमारांनी एक पाऊल टाकले. त्यांच्या मागे असंख्य पावले उमटू द्या. नितीश कुमार आगे बढो! भविष्यात तुम्हाला हजारोंची साथ नक्की मिळेल. राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो हे खरेच; पण याला संपवू आणि त्याला संपवू अशा वल्गना करणाऱ्यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचा इतिहास आहे! समझने वालों को इशारा काफी है!