The Kashmir Files, PM Modi Ajit Pawar: ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहेत. काश्मीरी पंडितांवर झालेला अन्याय असा चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केलं असून यात पल्लवी जोशी, अनुपम खेर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, दर्शन कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात काही राज्यात टॅक्स फ्री केला आहे. त्यामुळे सिनेमा करमुक्त करावा, अशी मागणी भाजपाच्या आमदारांकडून केली जात आहे. भाजपाच्या राज्यातील ९२ आमदारांच्या सहीचं एक पत्रही मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. या मागणीवर आज अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात उत्तर दिलं.
'द काश्मीर फाईल्स' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. राज्याने याआधी मिशन मंगल, तानाजी, पानिपत असे सिनेमे करमुक्त केले होते. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वक्तव्यामध्ये केला होता. हा सिनेमा केंद्रानेच करमुक्त करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. फक्त महाराष्ट्रात करमुक्त, असा भेदभाव कशाला ठेवायचा. केंद्राने जर या चित्रपटावरील GST रद्द केला तर तो निर्णय संपूर्ण देशालाच लागू होईल. त्यामुळे अगदी जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यत सर्वत्रच हा चित्रपट करमुक्त होईल, अशी भाजपा नेत्यांच्या मागणीवर अजित पवारांनी गुगली टाकली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या उत्तरानंतर विरोधी पक्षातील काही सदस्यांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला होता. पण अजित पवार यांचं बोलणं संपल्याशिवाय बोलायची संधी दिली जाणार नाही असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यावरून, 'पळाले रे पळाले' असं म्हणत सत्ताधारी सदस्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असा जयघोष केला.