'कर्नाटकचा निकाल देशाला एक नवी दिशा देणारा'; भास्कर जाधव यांचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 12:55 PM2023-05-13T12:55:12+5:302023-05-13T12:55:21+5:30
कर्नाटकमधील काँग्रेसच्या या विजयी वाटचालीवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस ११९, जेडीएस २५ तर भाजपा ७२ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ८ जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे.
#KaranatakaElectionResults | Trends of all the 224 Assembly constituencies declared; Congress surges ahead in 119 seats, BJP in 72 seats and JDS in 25 seats. pic.twitter.com/AJ7K6b2IIF
— ANI (@ANI) May 13, 2023
कर्नाटकमधील काँग्रेसच्या या विजयी वाटचालीवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा कर्नाटकचा निकाल हा देशाला एक नवी दिशा देणारा आहे. सर्व मतदारांचे अभिनंदन. जिंकून आलेल्या उमेदवारांचंही अभिनंदन. तसेच काँग्रेसचे प्रमुख मलिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांचंही भास्कर जाधव यांनी अभिनंदन केलं आहे. भाजपा हटाव संविधान बचाव, भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील कर्नाटकाच्या निकालावरुन भाजपावर टीका केली आहे. देशाची मन की बात कर्नाटकच्या निकालातून बाहेर पडली, २०२४ च्या निवडणुकीत जे कर्नाटकात झाले तेच देशात होईल. कर्नाटकच्या जनतेने खोके सरकारच्या नेत्यांना लाथाडले, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. राज्यातील मोठी टोळी कर्नाटकात गेली होती. कर्नाटकातील पराभव हा मोदींचा पराभव आहे. आपल्याच लोकांचा पराभव करण्यासाठी पैशांचा वापर खोके सरकारने केला, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.