कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस ११९, जेडीएस २५ तर भाजपा ७२ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ८ जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील कर्नाटकाच्या निकालावरुन भाजपावर टीका केली आहे. देशाची मन की बात कर्नाटकच्या निकालातून बाहेर पडली, २०२४ च्या निवडणुकीत जे कर्नाटकात झाले तेच देशात होईल. कर्नाटकच्या जनतेने खोके सरकारच्या नेत्यांना लाथाडले, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. राज्यातील मोठी टोळी कर्नाटकात गेली होती. कर्नाटकातील पराभव हा मोदींचा पराभव आहे. आपल्याच लोकांचा पराभव करण्यासाठी पैशांचा वापर खोके सरकारने केला, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.