महायुतीतील नेते मुद्दाम नवीन वादाला तोंड फोडत आहेत, कारण...; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:36 PM2024-07-31T23:36:34+5:302024-07-31T23:36:50+5:30
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या आरोपाला आता सत्ताधारी महायुतीकडून नेमकं काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Congress Vijay Wadettiwar ( Marathi News ) : राज्यात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांची राळ उडाली आहे. तसंच राज ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर मनसे आणि राष्ट्रवादीतही शाब्दिक युद्ध सुरू आहे. मात्र हा सगळा प्रकार जाणूनबुजून सुरू असून याच्या आडून सत्ताधारी महायुती आपला डाव साधत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे
सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "खालच्या थरावर जाऊन एकमेकांवर चिखलफेक करण्याचे काम मागील एका आठवड्यापासून राज्याच्या राजकारणात पुन्हा सुरू झाले आहे. आरोप, प्रत्यारोप आणि उणीदुणी सार्वजनिकरित्या काढून महायुतीतील सत्ताधारी नेते मुद्दाम नवीन वादाला तोंड फोडत आहे. यात महाराष्ट्राच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून सत्ताधारी आपले डाव साधून घेत आहे," असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे.
खालच्या थरावर जाऊन एकमेकांवर चिखलफेक करण्याचे काम मागील एका आठवड्यापासून राज्याच्या राजकारणात पुन्हा सुरू झाले आहे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 31, 2024
आरोप, प्रत्यारोप आणि उणीदुणी सार्वजनिकरित्या काढून महायुतीतील सत्ताधारी नेते मुद्दाम नवीन वादाला तोंड फोडत आहे. ह्यात महाराष्ट्राच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष…
"प्रत्येक शासकीय विभागात वाढलेला भ्रष्टाचार, रोज कोट्यवधी रुपयांचे शासन निर्णय काढून तिजोरीची सुरू असलेली लूट, वाढलेली कमिशनखोरी, शेतकऱ्यांच्या पिकाला न मिळालेला हमीभाव, महिलांवर होणारे हल्ले, बेरोजगारी हे सर्व प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. सत्ताधाऱ्यांचा हा तमाशा आपल्या राज्याच्या संस्कृतीला शोभून देखील दिसत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी नेहमी महाराष्ट्राला बदनाम करून महायुतीतील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच स्वतःचा फायदा करून घेतला आहे... आताही तोच डाव आहे," असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या आरोपाला आता सत्ताधारी महायुतीकडून नेमकं काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.