आमदारकी वाचविण्याचे प्रयत्न? कोकाटेंबाबत निकालाची प्रत विधिमंडळाला मिळालीच नाही; नार्वेकरांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:34 IST2025-02-23T06:34:23+5:302025-02-23T06:34:44+5:30
नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे आमदार सुनील केदार यांना जिल्हा बँक घोटाळ्यात कैदेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

आमदारकी वाचविण्याचे प्रयत्न? कोकाटेंबाबत निकालाची प्रत विधिमंडळाला मिळालीच नाही; नार्वेकरांचा खुलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षे कैदीची शिक्षा सुनावल्यानंतर आता आमदार म्हणून त्यांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. या निकालाची प्रत अद्याप विधान मंडळाला मिळालेली नाही.
नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे आमदार सुनील केदार यांना जिल्हा बँक घोटाळ्यात कैदेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. आता कोकाटे यांच्यासाठी नार्वेकर यांनी तोच न्याय लावावा, अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत, त्यामुळे नार्वेकरांची भूमिका या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे.
नार्वेकर काय भूमिका घेणार ?
नाशिकच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत आपल्याकडे आल्यानंतर आपण निर्णय घेऊ अशी भूमिका नार्वेकर यांनी घेतली आहे. तसेच महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्याशी सल्लामसलत करण्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे तत्काळ पोहोचवण्याची व्यवस्था करू, असे शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
...ती प्रत ग्राह्य धरली जात नाही
आपल्याला सुनावलेल्या शिक्षेविरोधात कोकाटे हे वरच्या न्यायालयात धाव घेणार आहेत. तेथे त्यांच्या शिक्षेला लगेच स्थगिती मिळाली तर त्यांची आमदारकी वाचेल अशी शक्यता आहे. अशी स्थगिती मिळावी आणि कोकाटे यांची आमदारकी वाचावी अशी खेळी खेळली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते करत आहेत. अशा निकालाची प्रत न्यायालयाकडून किंवा पोलिस विभागाकडून विधानमंडळ सचिवालयाकडे येणे अपेक्षित असते. मात्र ती अद्याप आमच्याकडे आलेली नाही. खासगी व्यक्तीकडून आलेली प्रत ग्राह्य धरली जात नाही, असे राहुल नार्वेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.