- हंसराज महाले
तळोदा (जि. नंदुरबार) : उसाच्या शेतात लपून राहिलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. गळ्यावर हल्ला केला. मी हात पुढे केला. त्याचा नेम चुकला. मी जमिनीवर पडलो. दुसऱ्या प्रयत्नात बिबट्या झडप घालणार तोच म्हशीने बिबट्याला शिंगावर घेऊन भिरकावून लावले. बिबट्याच्या रूपाने मी साक्षात डोळ्यासमोर मृत्यू बघितला. मात्र देवदूत बनून म्हशीने प्राण वाचविले, असा थरार बिबट्याच्या हल्ल्यात बचावलेले ६५ वर्षीय पशुपालक बादशहा भरवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
बालपणापासून पशुपालनाचा व्यवसाय करणारे बादशहा भरवाड हे गुरुवारी तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात गुरे चारत असताना शेजारील उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्या मादीसोबत दोन बछडे होते, तेदेखील बऱ्यापैकी मोठे होते, असे बादशहा भरवाड यांनी सांगितले.
तीन बिबटे पाहून गुरे सैरावैरा मादी बिबट्या व दोन बछड्यांना पाहून गुरेदेखील सैरावैरा पळू लागली. मात्र आपला मालक संकटात असल्याचे पाहून म्हशीने क्षणात शिंगांनी बिबट्याला जोरदार धडक देऊन भिरकावून लावले. म्हशीची हिंमत पाहून इतरही जनावरे तिच्या मदतीला धाऊन आली अन् बिबट्याने धूम ठोकली.