नागपूर - हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून नागपूर येथे सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक विधानभवनात पोहचले. त्यानंतर सभागृहात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचं म्हटलं गेले. परंतु यावर भाजपा आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांना जाहीर पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.
आता देवेंद्र फडणवीसांच्या या पत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहमती दिल्याचे समोर आले आहे. नवाब मलिक सत्तेसोबत असणे अयोग्य असल्याचं शिंदे म्हणाले. नागपूर येथे सभागृहाचं कामकाज संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यावेळी शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याची भूमिका आपण खपवून घ्यायला नको.आपल्याला भूमिका जाहीर करावी लागेल अशी चर्चा झाली. त्यानंतर संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून भाजपाची भूमिका अजित पवारांना कळवली. त्यानंतर शिवसेना आमदारांनीही त्यांची भूमिका मांडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांची भूमिका योग्यच आहे. आमचादेखील त्यांना पाठींबा आहे. ज्या गोष्टीच्या विरोधात आम्ही आधी होतो त्याच गोष्टीला आजही आमचा विरोध आहे असं त्यांनी म्हटलं. ABP माझानं अशी बातमी दिलीय. तर देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं असून मी ते पत्र वाचलं आहे.२ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडीनंतर नवाब मलिक हे कालच पहिल्यांदा सभागृहात आले आणि ते कुठे बसले हे सर्वांना माहीत आहे.मात्र त्यांनी स्पष्टपणे या सगळ्या घडामोडींबाबत भूमिका मांडलेली नाही. मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस पत्रात काय म्हणाले?"नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो" असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.