मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहखात्यावरून नाराजी असल्याची बातमी समोर आल्याने खळबळ माजली. शिवसेनेला गृहखाते हवं अशी मागणी नेत्यांकडून होऊ लागली आहे. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. गृहमंत्र्यांवर कुठलीही नाराजी नाही असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आला होता. या भेटीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले की, संजय राऊत यांची भावना योग्य आहे. गृह विभागाकडून कुठली कमतरता होत असेल तर त्याबाबत सुधारणा करू. महाविकास आघाडीत विश्वासात घेऊनच अनेक निर्णय होत असतात. प्रशासकीय कामकाजाबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली. आज संध्याकाळी ६ वाजता पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. गृहखाते मुख्यमंत्र्यांनी घ्यावं या प्रश्नावर मुख्यमंत्रीच उत्तर देतील. आमची बैठक पूर्वनियोजित होती असं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
महाविकास आघाडीत कुठेही विसंवाद नाही. कुठलाही संभ्रम निर्माण करू नका. मुख्यमंत्री प्रत्येक मंत्र्यांशी संवाद साधत असतात. राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद हवय असं भाजपा म्हणते. मग भाजपालाही मुख्यमंत्रिपद हवंय. ते पद कुणाला नको? भाजपाने उगाच त्रास करून घेऊ नये. मानसिक यातना झाल्यानंतर अशाप्रकारे झटके येत असतात. अडीच वर्ष तुम्हीही शांत बसा आणि आम्हालाही शांत बसूद्या. महाविकास आघाडीत ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहील असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी भाजपाला लगावला.
तसेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याची प्रदीर्घ बैठक झाली आहे. या बैठकीत चर्चा झाली आहे. एकमेकांची मते समजून घेतली आहेत. गृहमंत्री उत्तम काम करतायेत. महाविकास आघाडीचे सगळेच मंत्री काम करतायेत. त्यामुळे गैरसमज निर्माण करण्याचं काम कुणीही करू नये असंही राऊतांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी गृहखातं हाती घ्यावं अशी मागणी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. मागील सरकारमध्ये गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होते. मुख्यमंत्री आणि गृह खाते एकाकडेच असल्याच राज्याची प्रगती आणखी जोराने होऊ शकते असा दावा खैरे यांनी केला आहे.