लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) महावितरणच्या दरवाढ याचिकेवरील निर्णय जाहीर केला आहे. मात्र आयोगाचा हा आदेश ग्राहकांना फसवणारा आणि प्रचंड दरवाढीचा बोजा लादणारा आहे. वीजदरवाढ चुकीची आहे. त्यामुळे या आदेशाविरोधात दिल्लीतील विद्युत अपिलीय प्राधिकरण यांच्याकडे दाद मागण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रवीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली आहे.
महावितरण कंपनीने प्रस्ताव देतेवेळी सध्याच्या दरामध्ये इंधन समायोजन आकाराचा अंतर्भाव केला होता. आयोगानेही मागील आदेशाप्रमाणेच यावेळीही इंधन समायोजन आकार हा सध्याचा दर आहे, असे गृहीत धरून दरवाढीचे आकडे कमी दाखवलेले आहेत. प्रत्यक्षात ही सर्वसामान्य वीज ग्राहकांची फसवणूक आहे, असेही होगाडे यांनी सांगितले.