Manoj Jarange Patil, Maratha Reservation (Marathi News) राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. आज सकाळी ७ किंवा ८ च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार असून मनोज जरांगे त्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटलांची होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आली आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगे यांनी यावेळी दिली. यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर आज तोडगा निघाला आहे. सरकारने तोडगा काढल्याने आंदोलन सुरू ठेवण्याची गरज नाही, असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांचे उपोषण ज्यूस पिऊन संपवतील, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे सर्व अध्यादेश काढले असून आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहन देखील सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.