कोल्हापूर – राज्यात मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आणि महाविकास आघाडी स्थापन केली. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. एकेकाळचे कट्टर विरोधी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून शिवसेनेने(Shivsena) राज्यात मुख्यमंत्री बनवला. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भारतीय जनता पार्टीला विरोधात बसावं लागले.
त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. कालचक्र नेहमी फिरत असते. आता महाराष्ट्रात तुम्ही आहात, केंद्रात आम्ही आहोत. २०१४ ते २०१९ या कालावधीतही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा ३ वेळा प्रयत्न झाला. परंतु त्यावेळी ते जमलं नाही. व्हायचं नव्हतं मग ते आता का जमलं? त्यावेळी आमचे १२२ आमदार निवडून आले होते. मात्र दुर्दैवाने आता १२०-१३० आकडा क्रॉस करू शकलो नाही. थोडे कमी जास्त असते तर अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले असते असं त्यांनी सांगितले.
मात्र निवडणुकीवेळीच भाजपाच्या कमी जागा आल्या तर सोबत घ्यायचं नाही हे ठरलेले होते. संजय राऊत यांनी मोठी भूमिका निभावली. २०१४-२०१९ या काळात एकदा तर अर्थसंकल्पीय अधिवेशनातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा डाव होता. मात्र देवेंद्र फडणवीसांमुळे ते यशस्वी झालं नाही. निवडणुकीचे निकाल लागत होते. फडणवीस आणि मी पाहत होतो. तेव्हा युतीनं १६१ आकडा गाठला. त्यानंतर आम्ही उद्धवजींना फोन करून पत्रकार परिषद घेऊ असं म्हटलं. पण माझी पीसी वेगळी घेणार असे ते म्हणाले. तेव्हाच देवेंद्र फडणवीसांनी दादा, कुछ गडबड है असं म्हटलं. उद्धव ठाकरेंनी पीसी घेतली आणि आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं विधान केले असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांना शरद पवारांनी काम दिले. भाजपा आणि शिवसेनेत अंतर निर्माण करा. रोज तेल ओता, बाकी आम्ही बघतो. त्यानंतर अनेक घटना घडल्या. संजय राऊत तेल घालत राहिले आणि अंतर वाढत गेले. मात्र यात शिवसेनेचा खुर्ची मिळाली पण हिंदुत्वाचा प्लॅन उद्ध्वस्त करायचा हे त्यांच्या लक्षात आले नाही. आता कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत एकदा जर शिवसेनेचा मतदार हाताला मतदान करायला लागला तर तो पुन्हा शिवसेनेकडे येणार नाही असंही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.