दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: संपूर्ण राज्याचा प्रशासकीय कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातील ८० टक्के दूरध्वनी आठ दिवसांपासून बंद असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंत्रालयातील दूरध्वनीवर बाहेरून फोन येणे बंद आहे, तर मंत्रालयातून फोन केला तर समोरील व्यक्तीचा आवाजच ऐकायला येत नाही. विविध विभागांनी एमटीएनएलकडे तक्रार केली. मात्र, तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगून बोळवण करण्यात आल्याचे समजते.
संपर्क करणे झाले अवघड
मंत्रालयातील विविध विभागांत संपर्क करायचा असेल तर अधिकारी, कर्मचारी दूरध्वनीचा वापर करतात, कारणविभागांच्या दूरध्वनी क्रमांकाची यादी त्यांच्याकडे असते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात त्यामुळे संबंधित विभागात संपर्क करायचा तर अधिकाऱ्यांचा मोबाइल क्रमांक असूनही उपयोग नसतो. त्यामुळे दूरध्वनीवरच संपर्क करणे सोपे जाते. मात्र, मागील आठ दिवसांपासून कोणत्याही विभागात संपर्क करणे अधिकारी, कर्मचाऱ्यांना अवघड झाले आहे.
कर्मचाऱ्यांची पायपीट
अनेकदा एखाद्या विभागातून काही माहिती मागवायची असेल, फाईल मागवायची असेल, एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर दूरध्वनी बंद असल्याने थेट त्या विभागात जावे लागत आहे. यामुळे अधिकारी आणि कर्मचारीही त्रासले आहेत. याशिवाय मंत्रालयाच्या बाहेर आणि संपूर्ण राज्यातून प्रशासकीय यंत्रणेला मंत्रालयातील विविध विभागांत दूरध्वनीद्वारे संपर्क करणे अवघड झाले आहे.
तेव्हा गाडी पाठवावी लागली
यापूर्वी एकदा मुख्यमंत्री कार्यालयातील दूरध्वनी बंद झाले होते, तेव्हा गाडी पाठवून एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना मंत्रालयात आणून दूरध्वनी दुरुस्त करून घेतले होते.