अजित पवार यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांचा पक्षच फोडला आहे. आज अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आलेले ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत.
अजित पवारांनी नियमाप्रमाणे राष्ट्रवादीचे ५४ पैकी ४० आमदार सोबत घेतले आहेत. यामुळे ते वेगळा पक्ष स्थापन करणार की कोणत्या पक्षात सहभागी होणार हे अद्याप समोर आलेले नाहीय. कदाचित अजित पवार हे शिंदेसारखेच बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा सांगू शकतात अशी चर्चा सुरु आहे.
असे असताना अजित पवारांनी शपथ घेताच सभागृहात दोन घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. यामध्ये अजित पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है आणि त्यानंतर झालेली राष्ट्रवादी काँग्रेस झिंदाबादची. यामुळे अजित पवार हे पक्षातून बाहेर न पडता राष्ट्रवादीतच असल्याचा दावा करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.