विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी उघड झाली. निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर अनेक आमदार नॉट रिचेबल झाले होते. तसंच सध्या एकनाथ शिंदे आणि अन्य आमदार गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. परंतु यापूर्वी एकनाथ शिंदे आणि आमदार सूरतला असताना त्यांच्या मनधारणीसाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना पाठवण्यात आलं होतं. परंतु आता याला एक वेगळंच वळण मिळालं आहे.
शिवसेनेकडून ‘शिंदेसेने’त सामील झालेल्या आमदारांची मनधारणी करण्यासाठी गेलेले रविंद्र फाटक हेच आता ‘शिंदेसेने’त सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा उद्धव ठाकरे यांना मोठा झटका मानला जात आहे. रविंद्र फाटक हेदेखील गुवाहाटीला पोहोचले आहेत.
व्हिडीओ आला समोरबंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ माध्यमांमध्ये झळकला आहे. या व्हिडिओत बंडखोर आमदार एकमताने एकनाथ शिंदे यांना गटनेता बनवत असल्याचं घोषित करत आहेत. त्यानंतर शिंदे आमदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जे सुख-दुःख आहे, ते आपलं सगळ्यांचं एक आहे. काही असेल तर आपण एकजुटीने पुढे जाऊ, विजय आपलाच आहे. तुम्ही जे म्हणालात ते नॅशनल पार्टी आहे, महाशक्ती आहे, अख्ख्या पाकिस्तान काय परिस्थिती होती माहितीय असं त्यांनी सांगितले.
त्यानंतर नॅशनल पार्टी, महाशक्ती. त्यांनी मला सांगितलंय, तुम्ही जो हा निर्णय घेतला आहे, हा देशातला ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काही लागलं तर कधीही कमी पडणार नाही, याची प्रचिती आपल्याला जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा येईल असं सांगत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठिंबा असल्याचं सूतोवाच केले आहेत.