सांगली : सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूलचा उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतला आहे. या संदर्भात त्यांंनी सांगलीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून माहिती घेतली.सांगलीच्या या पॅटर्नची राज्यभर चर्चा होत असल्याने मंत्री भुसे यांनीही शिक्षण खात्याचा कार्यभार स्वीकारताच हा निर्णय घेतला. गायकवाड यांनी मॉडेलचे सादरीकरण त्यांच्यापुढे केले. भुसे यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारताच मालेगाव तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी संवाद साधला. शाळांची व शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सांगली पॅटर्नची निवड मार्गदर्शक स्वरूपात केली.सांगलीत तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांनी मॉडेल स्कूल मोहीम सुरू केली. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्यामार्फत जिल्हाभरात राबविली. सध्या जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळांचा कायापालट झाला आहे. भौतिक सुविधांसोबतच शैक्षणिक दर्जाही उंचावला आहे. या कामी लोकांचाही सहभाग घेतला आहे. डुडी सध्या साताऱ्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मंत्री भुसे यांनी त्यांच्याकडूनही या उपक्रमाची माहिती घेतली. त्यानंतर गायकवाड यांना या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी पाचारण केले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार गायकवाड यांनी भुसे यांना या अभियानाची संपूर्ण माहिती दिली. राज्यभरात यापूर्वी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या प्रयोगांची माहिती घेऊन गुणवत्तेचा पथदर्शक नवीन पॅटर्न तयार करणार असल्याचे भुसे म्हणाले. शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करू असेही त्यांनी सांगितले.काय आहे सांगलीचा मॉडेल स्कूल पॅटर्न?मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत शाळांना सर्व भौतिक सुविधा देण्यात आल्या आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, हॅपिनेस प्रोग्राम, शैक्षणिक चित्रफिती, खेळातून शिक्षण, नव्या कोऱ्या सुसज्ज इमारती, प्रोजेक्टर, एलसीडी, संगीत साहित्य, ग्रंथालय, खेळण्याचे साहित्य आदी उपलब्ध केेले आहे. पुरेसा शिक्षकवर्गही दिला आहे. याचा अनुकूल परिणाम दिसला असून शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. भुसे यांच्यासमोर सादरीकरण करताना समग्र शिक्षण अभियानाचे प्रभारी कार्यकारी अभियंता उमेश पाटील, विशेष शिक्षक राहुल राजे कुंभार आणि विषयतज्ज्ञ सुशांत माळी हेदेखील उपस्थित होते.
सांगलीतील मॉडेल स्कूल पॅटर्न राज्यभर राबविणार, शिक्षणमंत्र्यांचा निर्णय; नेमका काय आहे पॅटर्न.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:44 IST