मुंबई - पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल अशी शक्यता आहे. अटल बिहारी वाजपेयींचे सरकार १३ महिन्यात गेले होते त्याची पुनरावृत्ती होताना दिसेल असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हरियाणात जर भाजपाला त्यांचे सरकार टिकवता आले तर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल अशी भाजपाला आशा आहे. मात्र हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्येही भाजपाचा दारूण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचीच परिणाम म्हणून पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल. ज्याप्रमाणे अटलबिहारी वाजपेयींचे सरकार १३ महिन्यात गेले होते त्याचीच पुनरावृत्ती होताना मला दिसतेय असं विधान त्यांनी केले.
तर महाविकास आघाडीत जे एकमत आहे, समन्वय आहे, मैत्रीपूर्ण वातावरणात आमची चर्चा सुरू आहे पण त्याविरोधात महायुतीतील धुसफूस सुरू आहे. एका मित्रपक्षाला काढून टाकायचे का? त्याच्यामुळे नुकसान झालं का ही चर्चा उघडपणे पुण्यात सुरू असल्याचं ऐकतोय. महाविकास आघाडीत असं काही वातावरण नाही असं सांगत पृथ्वीराज चव्हाणांनी महायुतीवर निशाणा साधला.
लवकरच महायुतीत मोठी गडबड शक्य
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा या ठाकरे गटाच्या मागणीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी हाच चेहरा राहणार आहे. बैठकीत आम्ही हे जाहीरपणे सांगितलेले आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदापेक्षा महाराष्ट्र धर्म आणि संस्कृती तसेच महाराष्ट्र वाचवणे हे कर्तव्य आहे. यासाठी आम्ही सगळे काम करत आहोत, निवडणुका कधी लागतील, हे सांगता येत नाही. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयात बसतो. महायुतीमध्ये महाभारत चालले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हात वर केले आहेत. पुढील महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. या निकालाकडून फार अपेक्षा आहेत असं पटोलेंनी सांगितले.