Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. पात्र महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रक्षाबंधानाआधीच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलं आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि त्याची सुरुवात केली आहे, असं म्हटलं आहे.
महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने १७ ऑगस्ट रोजी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे ३००० रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आजपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना पैसे देण्याचे ट्रायल रन सुरु असल्याचे म्हटलं आहे.
महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. आतापर्यंत जवळपास एक कोटी ३५ महिला पात्र ठरल्या असून, त्यांच्या खात्यात १७ ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत. अशातच ३१ जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या लाभाची तीन हजारांची रक्कम टाकण्यात आली आहे. ३१ जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या महिलांच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
"आम्ही सांगितल्याप्रमाणे १७ तारखेला जेवढ्या आमच्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते जमा झालेले आहेत. हे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो. याची सुरुवात झाली आहे. विरोधकांचे याच्याकडे काहीच उत्तर नाही. सावत्र भावांना ही योजना बंद पाडायची आहे. महायुतीचे सरकार देणारे आहे याची प्रचिती आता तुम्हाला येईल. ही तपासणी सुरु आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि त्याची सुरुवात केली आहे. पैसे देण्याचे ट्रायल रन सुरु आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.