मुंबई - गेल्या ६ दिवसांपासून सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजलं. या अधिवेशनात पहिल्यांदाच शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या अधिवेशनात आंदोलनाच्या निमित्ताने विरोधक-सत्ताधारी एकमेकांना भिडल्याचं चित्रही महाराष्ट्राला पाहायला मिळाले.
हिवाळी अधिवेशन सोमवार दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे घेण्यात यावे अशी शिफारस सभागृहानं राज्यपालांना केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ६ बैठका, एकूण कामकाज ५७ तास २५ मिनिटं, अन्य कारणामुळे वाया गेलेला वेळ निरंक, रोजच्या कामकाजाचे तास सरासरी ९ तास २५ मिनिटे, एकूण प्रश्न ४ हजार ८१५, स्वीकृत प्रश्न २५१, सभागृहात उत्तरीत झालेले प्रश्न २२, लक्षवेधी सूचना ८६२, नियम ५७ च्या सूचना २२, संमत करण्यात आलेली विधेयकं १०, विधान परिषदेत एकही विधेयक संमत करण्यात आले नाही. नियम २९३ अन्वये २ मुद्दे चर्चेत आले. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीवर ११ मुद्दे उपस्थित करण्यात आले असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.
यावरून अधिवेशनाची सांगता करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी घोषणा केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, अधिवेशन काळात विधान भवन परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सदस्यांनी एकमेकांविषयाच्या आदर भावनेला धक्का पोहचू नये यासाठी विधान भवनात पाळण्याची शिस्त, शांतता सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी समितीचं गठन करण्यात आले आहे. या समितीत विधानसभा अध्यक्ष, उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, हितेंद्र ठाकूर, प्रविण दरेकर, अनिल परब, अमर राजूरकर, शशिकांत शिंदे, जयंत पाटील(शेकाप), कपिल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.