मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामुळे राज्यातील सत्तासमिकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. या बंडामुळे राज्यात सत्तांतर झालं असून, शिवसेनेतही मोठी फूट पडली आहेत. दरम्यान, सत्ताबदलानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाली होती. तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला होता. दरम्यान, शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मराठवाड्यातील फायरब्रँड नेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात यावी, यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे पत्र दिले आहे.
शिंदेंच्या बंडानंतर मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. मात्र काही आमदार आणि खासदारांसह इतर अनेक शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबत राहिले. विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्यांपैकी एक आहेत. तसेच त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोरांवर घणाघाती टीक करण्याचा धडाका लावला होता. तसेच सर्वच आमदार शिंदे गटात गेल्याने खिळखिळे झालेले औरंगाबादमधील संघटन बांधण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
दरम्यान, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट घेऊन, त्यांच्याकडे अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठीची शिफारस करणारे पत्र दिले. अरविंद सावंत म्हणाले की, आज आदरणीय उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अंबादास दानवे यांची नियुक्ती व्हावी, अशी शिफासर करणारं पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिलं आहे. आता या पदावर अंबादास दानवे यांची नियुक्ती होईल, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.