मुंबई - २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-भाजपा यांची युती होणार होती. लोकसभेच्या निवडणुकीत १६-१६-१६ जागा लढवण्याचं ठरवलं होतं. दिल्लीत माझ्या घरी ही बैठक झाली होती. तिथे युतीचं जवळपास सर्व निश्चित झालं होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी केला आहे. कर्जत येथील चिंतन शिबिरात बोलताना पटेल यांनी हा दावा केला.
प्रफुल पटेल म्हणाले की, दिल्लीत प्रमोद महाजन यांच्यासोबत युतीची चर्चा सुरू केली. ही चर्चा अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या सूचनेवरून ही बैठक झाली. युती होणार म्हणून गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु या चर्चेत मुंडे फारसे सहभागी नव्हते.प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण जर युती झाली तर दिल्लीतील श्रेष्ठी शरद पवारांचे जास्त ऐकतील आणि आपले महत्त्व कमी होईल असं त्यांना वाटत होते. महाजन यांनी ही बातमी बाळासाहेबांना सांगितली. त्यानंतर बाळासाहेबांनी काही विधाने केली आणि २००४ मध्ये होणारी युती फिस्कटली असं त्यांनी म्हटलं.
तसेच माझ्या पुस्तकाची वाट पाहा, अशा बऱ्याच गोष्टी ज्या अजितदादांनाही माहिती नाहीत त्या मला माहिती आहेत. २०१४ ला युतीचा प्रयत्न झाला तो दुसऱ्यांदा झाला होता. त्याआधी २००४ मध्ये झाला होता. जे काही झाले ते झाले. शरद पवारांवर आपण काही बोलत नाही. व्यक्तिगत टिप्पणीही करण्याचं कारण नाही.पण सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना १४० खासदार हे शरद पवारांसोबत होते.मात्र देवेगौडा पंतप्रधान झाले. केसरी यांच्या स्वभावाला कंटाळून देवेगौडा राजीनामा देणार होते. त्यांनी शरद पवारांना पंतप्रधान होण्यासाठी निरोपही पाठवला. देवेगौडा आणि १४० खासदार एकत्र असूनही शरद पवार ऐनवेळी माघारी फिरले. हे मला अजूनही कळाले नाही.शरद पवारांना संधी असूनही शेवटच्या क्षणी ते माघारी फिरतात असं विधानही प्रफुल पटेलांनी शरद पवारांबद्दल केले आहे.
दरम्यान, आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत नाही. पुढील २० ते २५ वर्षे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. हे शिबिर घेण्यामागे एक भावना आहे. पक्षात चिंतन, मंथन, पक्षाची ध्येयधोरणे ठरवली जातात म्हणून हे शिबिर घेतले आहे. अजितदादा पवार यांनी घेतलेल्या निर्णयामागे हजारो, लाखो लोक आहेत. अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय ही साधी गोष्ट नाही. जसा शंभर टक्के पवारसाहेबांच्या पाठीशी राहिलो तसा अजितदादांच्या पाठीशी राहणार आहे. अजितदादांनी घेतलेली महत्वाची भूमिका ही राज्यासाठी, देशासाठी आणि पक्षासाठी आहे. आपला पक्ष, आपले घर मजबूत करायचे आहे, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहन प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले.