पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच, खासदार विशाल पाटील अन् विश्वजित कदमांचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 03:34 PM2024-06-23T15:34:36+5:302024-06-23T15:35:36+5:30
लोकसभा निवडणुकीत राज्यात सांगली मतदारसंघाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्यामागे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काँग्रेस नेते होते. सुरुवातीपासून विशाल आणि विश्वजित यांनी सांगली जागेचा आग्रह धरला. मात्र काँग्रेसकडून ही जागा न मिळाल्याने विशाल पाटील अपक्ष लढले आणि जिंकले. जिंकून येताच विशाल पाटील हे काँग्रेसमध्ये गेले.
सांगली - राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं. वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केले तर सांगलीचा मुख्यमंत्री असेल की नाही माहिती नाही परंतु राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आमदार विश्वजित कदमांनी म्हटलं आहे. मिरजेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे दोन्ही नेते बोलत होते.
यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले की, आपण भाजपाचा पराभव करू शकतो, धनशक्तीचा पराभव करू शकतो. या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगलीतून कळालं. मिरज शहरातील सर्व समाजाने धाडसाने पुढे येऊन मतदान केले आहे. लिंगायत, मराठा, धनगर समाजाने आपल्याला मतदान केले. मनोज जरांगे पाटलांना जी वाईट वागणूक या सरकारने केली त्यामुळे मराठा समाजाने भाजपाला बदला घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप त्यांनी केला.
तसेच महाराष्ट्रात आपल्याला काँग्रेसचं सरकार आणायचं आहे. आपण एक झालो आहोत. आपल्याला अहोरात्र एक होऊन काम करायला लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघात, तालुक्यात संपर्क कार्यालय उघडून लोकांची कामे करायची आहेत. काँग्रेसचा पुरोगामी विचार लोकांपर्यत पोहचवायचे आहेत. आगामी विधानसभेत सांगली जिल्ह्यातील ४-५ आमदार काँग्रेसचे निवडून देऊ असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केले.
पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे नक्की
सांगली जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आले. मिरज शहरातील लोकांना फसवण्यात आले. हे माणसं विसरली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व ताकदीने मतभेद विसरून आपल्याला एक दिलाने काम करायचे आहे. विशालराव, येणाऱ्या काळात महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल. तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हा येणारा काळ ठरवेल पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.
सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीने काम केले नाही
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे. आम्ही २१ जागा लढलो, सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आमचे काम केले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात २० जागांवर आम्ही लढलो असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील निवडणुकीला उभे होते. परंतु त्याठिकाणी काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत बाजी मारली. विशाल पाटील यांनी खासदार म्हणून निवडून येताच काँग्रेसला पाठिंबा दिला.