सुरेश भुसारीमहाराष्ट्रकाँग्रेसबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठी संभ्रमात आहेत. यापुढील निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढायचे की आघाडीतून मार्गाक्रमण करावयाचे, याबद्दल अद्यापही पक्षश्रेष्ठींसमोर चित्र स्पष्ट नाही. नेतृत्वाचा अनुशेष ही पक्षश्रेष्ठींपुढील चिंता आहे.
महाविकास आघाडी टिकण्याची शक्यता मावळत चालली आहे. शिवसेनेत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी नको’ असा दबाव सतत वाढत आहे. काँग्रेसमधील काहीजणांना राष्ट्रवादीची साथ नको आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकमुखी नेतृत्व उरलेले नसल्याने राज्यातील स्थितीबद्दल अद्यापही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना नेमकी स्थिती कळायला मार्ग नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तोडीचा नेता काँग्रेसमध्ये नाही. यामुळेच अनेक मुद्द्यांवर पवारांशी चर्चा करून पक्षश्रेष्ठी निर्णयाप्रत जात आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केली खरी; परंतु काहींचा आघाडी केल्याशिवाय पक्षाचे काही खरे नाही, यावर ठाम विश्वास आहे. या संभ्रमावस्थेबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना महाराष्ट्रात काँग्रेसपुढे आव्हान असल्याचे मान्य केले. महाराष्ट्रात काँग्रेसला ७० आमदार निवडून आणण्याचे आव्हान आहे, असेही खरगे यांनी सांगितले.
पक्षादेश धुडकावणाऱ्यांना तूर्तास अभय? राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये सातजणांनी पक्षादेश धुडकावल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर मोहन प्रकाश यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मोहन प्रकाश हे महाराष्ट्रात गेलेले नाहीत. पक्षादेशाचे पालन न करणाऱ्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांसारखे ज्येष्ठ नेते असल्याने पक्षश्रेष्ठींची चिंता अधिक वाढली आहे.
नितीन राऊतांची दिल्ली वारी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी दिल्लीत येऊन पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. या भेटीबाबत डॉ. राऊत म्हणाले, विशेष कोणताही अजेंडा नव्हता. काही नेत्यांची सदिच्छा भेट घेण्याचा उद्देश होता.