अलिबाग : मच्छीमार समाजातील तरुण आपल्या पारंपरिक व्यवसायापासून दूर जाऊ नयेत यासाठी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन आदींचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र यावर्षी फक्त चार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी तर तीनच विद्यार्थी होते.
रायगड जिल्ह्याला सुमारे अडीचशे किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे मासेमारी मुख्य व्यवसाय आहे. मात्र निसर्गचक्रामुळे यावर उदरनिर्वाह करणे मच्छीमारांना अशक्य झाले आहे. त्यामुळे आपल्या मुलांनीही यात उतरावे असे पालकांना वाटत नाही. त्यामुळे यासाठीच्या प्रशिक्षणातही सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे.
कसे असते प्रशिक्षण
प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्यक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिद्धांतिक ज्ञान दिले जाते.
अट काय आहे
उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत व इतर आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रशिक्षणात सहभागी होता येते.
प्रशिक्षणाचे फायदे काय?राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसाहाय्य घेऊन मच्छीमारी नौका बांधता येते. सरकारी किवा खासगी विभागांच्या सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते.
प्रशिक्षणार्थींची संख्यावर्ष विद्यार्थी संख्या२०१९ : २७२०२० : ३६२०२१ : ३१२०२२ : १३२०२३ : ३२०२४ : ४