Jayant Patil Rajkot Fort News Marathi: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून राजकारणात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला.
"सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली पाहिजे. बांधकाम खात्याने केलेला भ्रष्टाचार उघडकीस आला पाहिजे", अशी मागणी जयंत पाटील यांनी राजकोट किल्ल्यावरील आंदोलनावेळी महायुती सरकारला लक्ष्य केले.
'एक झाड पडले नाही, पुतळा पडला', जयंत पाटलांचा उलट सवाल
ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने पुतळा पडला असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले, "दुर्दैव आहे की, अशा पद्धतीची लोक महाराष्ट्रात राज्य करत आहेत. ४५ प्रति किमी वेगाने वारे वाहिले म्हणून पुतळा पडला असे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. अहो, त्या दिवशी ४८ किमी वेगाने वारे वाहत होते. एकही झाड या भागात पडले नाही. पुतळा पडला."
"ज्या बाजूने वारे येत होते, त्याच बाजूने पडला. या सगळ्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खाते आणि महाराष्ट्र सरकारची आहे. एकनाथ शिंदेंची आहे. या राज्याच्या बांधकाम मंत्र्यांची आहे. स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे", असे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटलांचा केसरकरांवर पलटवार
"या भागातील मंत्री म्हणतात की काहीतरी चांगले घडायचे असेल... हो, एकच गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली होऊ शकते, ती म्हणजे महायुतीचे सरकार महाराष्ट्रातील जनता गाडून देईन आणि पुन्हा एकदा जनतेचे राज्य आणण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया", असे म्हणत जयंत पाटलांनी दीपक केसरकरांना उत्तर दिले.
राजकोट किल्ल्यावरील राड्यावर जयंत पाटील म्हणाले...
"छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत जी दुर्घटना घडली, तिथे गेलो. त्याठिकाणी कोणताही अभिनिवेश आमच्या कुणातही नव्हता. ही दुःखद घटना आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यातून लोक येणार होती. पण, दुर्दैवाने झाला तो प्रकार हा निषेधार्ह आहे. लोकशाही ऐवजी झुंडशाही महाराष्ट्रात निर्माण करणे. लोकांमध्ये भय निर्माण करणे, हे महाराष्ट्रावर सत्ता असणारी लोक करणार आहेत. महाराष्ट्रातील जनता झालेल्या दुर्घटनेचा जाब या सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा जयंत पाटलांनी दिला.