मुंबई : आजच्या दिवशी २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर करून देशातील स्थिर अर्थकारणाची हत्या केली. आज सहा वर्ष सरली तरी दुखवटा मात्र सरला नाही. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस 'नोटाबंदीला श्रद्धांजली' वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे.
लोकांचे दरडोई उत्पन्न जे २०१६-१७ मध्ये ८.२ टक्के होते ते २०२०-२१ मध्ये -७.३ टक्के झाले आहे. नोटबंदीमुळे सुमारे ३ कोटी लोकांनी आपली नोकरी गमावली. सध्याचा बेरोजगारीचा दर ७.७७ टक्के इतका वाढला आहे. महाराष्ट्रातील सुमारे ८० हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय २०१६ पासून कायमचे बंद झाले आहेत अशी धक्कादायक माहितीही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये दिली आहे.
याचबरोबर, मध्यमवर्गीयांच्या संसाराचा गाडा कसाबसा पुढे रेटला जातोय...आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही नोटबंदीला श्रद्धांजली वाहून आम्ही अच्छे दिनाची वाट पाहतो आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.