मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महायुती आणि निवडणुकीतील रणनीती यावर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने पक्षाने विधानसभेच्या १५० जागा लढवाव्यात असा सूर नेत्यांचा होता.भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वात राज्यातील कोअर कमिटीची बैठक अलीकडेच पार पडली. या बैठकीत पक्षाने किती जागा लढवाव्यात यावर चर्चा झाली.
भाजपाच्या या बैठकीत विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. २०१९ मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला होता. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात सर्वात मोठा पक्ष बनायचं असेल तर तितक्याच जागा पक्षाला लढवाव्या लागतील असं मत नेत्यांनी मांडले. १५० पेक्षा जास्त जागा भाजपानं लढवून महायुतीत सर्वात जास्त जागा लढल्या पाहिजेत असं नेते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीतील पक्षांना विधानसभानिहाय मिळालेली मते, मागील विधानसभेतील निकाल आणि सर्व्हे या आधारे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटप होईल. गेल्या निवडणुकीत ज्या पक्षाने जी जागा जिंकली ती त्याच पक्षाकडे राहील. परंतु काही मोजक्या जागांवर फेरबदल होण्याची शक्यता आहे. जास्तीत जागा जिंकण्यावर भाजपाचा भर असेल. विधानसभेचे जागावाटप याचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना द्यावेत असंही मत कालच्या बैठकीत मांडले गेले.
महायुतीत तणाव?
राज्यात महायुतीत सर्वाधिक १५० जागा जर भाजपाने लढवल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा लढायला मिळणार असा प्रश्न उपस्थित होतो. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं विधानसभेला १०० जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही ८० ते ९० जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी सर्वाधिक जागा लढवण्यावर महायुतीतील पक्षांचा भर आहे. त्यात भाजपाने १५० हून अधिक जागांवर लढायचं ठरवलं तर महायुतीत तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.