अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि पक्षावर बंडखोर आमदारांकडून सतत होणारी बदनामी थांबवा, अन्यथा जशास तसे प्रत्त्युत्तर देऊ, असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार सुनील तटकरे आता या सगळ्या नाट्यात मैदानात उतरले आहेत. तटकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावरही शाब्दिक हल्ला चढविला आहे. त्यामुळे आता शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसही बंडखोरांबाबत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर पहिल्यांदाच तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट हा राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होऊन बाहेर पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री, मंत्री यांनी निधी वाटपात अन्याय केल्याचा सतत आरोप बंडखोर आमदार करीत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस ही आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. बंडखोर आमदारांनी केलेले आरोप ही त्यांची केविलवाणी धडपड आहे. बंडखोरांनी पक्षाची आणि शरद पवार यांची बदनामी थांबवा, अन्यथा योग्य वेळी त्याचे उत्तर देऊ, असा इशारा खा. तटकरे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीतून शिवसेना असा प्रवास करणारे दीपक केसरकर हे पवारांना सल्ला देण्याइतके मोठे नाहीत. त्यांनी पवारांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोष देण्याचा प्रयत्न करू नये.