'गेले दोन दिवस...'; छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:41 IST2024-12-18T11:38:51+5:302024-12-18T11:41:53+5:30

मंत्रिमंडळात समावेश करण्यात न आल्याने छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली.

'The past two days...'; Sunil Tatkare presented the party's position regarding Chhagan Bhujbal's displeasure | 'गेले दोन दिवस...'; छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका

'गेले दोन दिवस...'; छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका

Sunil Tatkare Chhagan Bhujbal News: मंत्रिमंडळातून बाहेर ठेवल्याने छगन भुजबळ नाराज झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारापासून ते सातत्याने नाराजी मांडत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबद्दल भाष्य केले. भुजबळांची भेट घेणार असल्याचे संकेतही तटकरेंनी दिले असून, भुजबळांशी वेळोवेळी पक्षाने चर्चा केली आहे, असेही स्पष्ट केले.  

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भुजबळांच्या नाराजीबद्दल भूमिका मांडली. सुनील तटकरे म्हणाले, "भुजबळांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या ज्येष्ठतेबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही. त्यामुळे ज्यावेळी गाठीभेटी होतील, त्यावेळी आम्ही सविस्तरपणाने बोलू. गेले दोन दिवस माझं समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशी चर्चा चालू आहे. मला वाटतं यावर एक-दोन दिवसांत पडदा पडेल", असे तटकरे यांनी सांगितले.  

योग्य वेळी भुजबळांना भेटू -सुनील तटकरे

"योग्य वेळ येईल, तेव्हा नक्की आम्ही भेटायला जाऊ. आता मी दिल्लीमध्ये लोकसभेच्या अधिवेशनासाठी आहे. प्रफुल्ल पटेलही इथे आहेत. नागपूरलाही विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे या सगळ्यात त्यांना कशा पद्धतीने भेटता येईल, याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रफुल्ल पटेलांची छगन भुजबळांशी चर्चा झाली होती. वेळोवेळी अनेक विषयांवर त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली", अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली. 

छगन भुजबळ यांची तीन नेत्यांवर (अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल) नाराजी दिसत आहे, असे सुनील तटकरे यांना विचारण्यात आले. 

सुनील तटकरे म्हणाले, "असे आहे की, ज्या ज्या वेळी पक्षाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्याची वेळ आली, त्या त्या वेळी भुजबळ होते. विधानसभेला आपण बघतो आहोत की, बहुसंख्य आमदार सोबत असल्यामुळे त्यांचीच उमेदवारी झाली. हे त्यांना माहिती होतं." 

"नाशिकमध्ये हिरामण खोसकर काँग्रेसमधून आले. ते विद्यमान आमदार होते. सरोज अहिरे विद्यमान आमदार होत्या. नरहरी झिरवळ विद्यमान आमदार होते. माणिकराव कोकाटे विद्यमान आमदार होते. दिलीप बनकर, नितीन पवार हेही विद्यमान आमदार होते. या सगळ्यांच्या बाबती भुजबळांसोबत चर्चा झाली होती. ते ज्येष्ठ नेते आहेत", असे भाष्य सुनील तटकरे यांनी केले. 

Web Title: 'The past two days...'; Sunil Tatkare presented the party's position regarding Chhagan Bhujbal's displeasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.